शेळी मेंढी पालनासाठी अनुदान :राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना बळ देणाऱ्या यशवंतराव होळकर महामेष योजना अधिक प्रभावीपणे राबविता यावी यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिली आहे.
या योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.
स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई- सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जाईल.
मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान इ. घटकांचा समावेश केला आहे. मेंढ्यासाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन आहे,
अशा कुटुंबांना जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह ६ हजार असे एकूण २४,०००/- चराई अनुदान वाटप केले जाणार आहे. मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५ टक्के अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणुन कमाल ५० हजार एवढे अनुदान दिले जाणार आहे.