PM Kisan yojana राज्यातील अंदाजे ९२ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा १९ वा हप्ता येत्या फेब्रुवारीअखेर मिळण्याची शक्यता आहे.‘पीएम किसान’मध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने तीन हप्त्यांमध्ये वाटली जाते. वेळापत्रकानुसार या योजनेतील १९ वा हप्ता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ असा आहे.
केंद्राकडून या हप्त्याची रक्कम २४ फेब्रुवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाऊ शकते. त्यासाठी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे. तेथेच १९ व्या हप्त्याचे वाटप होऊ शकते. केंद्रीय कृषी मंत्रालयात त्याबाबत नियोजन चालू असल्याचे कृषी आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्राने देशातील शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’चा अठराव्या हप्ता वाशीममधील शेतकरी मेळाव्यातून पाच ऑक्टोबर २०२४ रोजी दिला होता. त्या वेळी २० हजार कोटी रुपये सर्व राज्यांमधील ९ कोटी ४० लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले गेले होते. त्यापैकी एक हजार ८८९ कोटी रुपये महाराष्ट्रातील ९१ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना मिळाले होते. PM Kisan yojana
‘पीएम किसान’चा लाभ मिळण्यासाठी केंद्राने यंदा ई-केवायसी, अद्ययावत भूमी अभिलेख व आधार संलग्न बॅंक खाते अशा तीन अटी सक्तीच्या केल्या आहेत. या अटींची पूर्तता होण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंत अनेक वेळा मोहिमा राबविल्या आहेत. त्यानुसार, योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आता ९६ लाख ९९ हजार आहे.
परंतु राज्यातील अजूनही चार लाख शेतकरी या अटींमध्ये बसत नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, केंद्र शासनाने आतापर्यंत या योजनेत देशातील ११ कोटी शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे (डीबीटी) वाटली आहे. मध्यस्थ व दलालांचा हस्तक्षेप नसलेली ही सध्याची एकमेव योजना असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शिवारातून तपासा योजनेची स्थिती
शेतकऱ्यांना शिवारातून ‘पीएम किसान’ योजनेची स्थिती समजू शकते. त्यासाठी भ्रमणध्वनीत ‘गुगल प्ले स्टोअर’मधून ‘पीएम किसान’ (PMKISAN Gol) नावाचे उपयोजन (अॅप) डाउनलोड करावे. तेथे नोंदणी क्रमांक टाकून ओटीपी मिळवावा. त्यानंतर ‘डॅशबोर्ड’वर क्लिक करावे. पुढे ‘बेनिफिशरी स्टेट्स’ क्लिक करावे. या ठिकाणी आता १ ते १८ हप्त्यांचे क्रमांक दिसतील. त्यात पुन्हा ‘गेट डिटेल्स’वर क्लिक करताच योजनेच्या लाभाची माहिती मिळते. PM Kisan yojana